न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह पिस्तूल खरेदी करणा-याला देखील निगडी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून ३ लाख ९० हजार ४०० रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल, काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली आहे.
अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय २८, रा. रावेतगाव), परशुराम उर्फ बाब करू गडदे (वय २४, रा. सरगल मळा बोरी पारधी दत्तमंदिराजवळ, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक प्रीतम वाघ यांना माहिती मिळाली की, सोन्या जाधव गावठी कट्टा विक्रीसाठी इनर व्हील क्लब चौक, आकुर्डी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी इनर व्हील क्लब चौक परिसरात सापळा रचला. सोन्या जाधव रिक्षातून आला आणि संशयितरित्या कारमध्ये (एम एच १४ / ई वाय ७७७४) बसला. पोलिसांनी कारला वेढा लावून दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळाला. पोलिसांनी कारसह एकूण ३ लाख ९० हजार ४०० रुपये किमतीचा हा ऐवज जप्त केला.















