न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- भोसरी मतदारसंघात निवडणूक विभागाने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. उमेदवारांकडून होणारा छुपा प्रचार, मतदारांना देण्यात येणारी प्रलोभने या माध्यमातून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या भरारी पथकांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीन पथके नियंत्रणाचे काम पाहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर १८ हजार मतदार वाढल्यामुळे मतदान केंद्राची संख्याही वाढली असून लोकसभा निवडणुकीपेक्षा २४ मतदान केंद्र अधिक असणार आहेत. त्यानुसार, प्रत्येक झोन सोठी एक अशा पद्धतीने विभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. तर मतदारसंघात होणारी पैशांची उलाढाल, आचारसंहिता भंग करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके सक्रिय करण्यात आली असून या भरारी पथकामध्ये निवडणूक विभागाचा एक अधिकारी, एक पोलीस उपनिरीक्षक व चार इतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. शिवाय या पथकाच्या मदतीसाठी आणखी तीन संनिरीक्षण पथके असणार आहेत. या पथकामध्येही एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.















