न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणीच व महाराष्ट्र सहकार कायदा कलम ७८ चे उल्लंघन आहे, असा आरोप पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज एमआयडीसीचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे व देशाचे आदरणीय नेते शरद पवार साहेब यांच्या विरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल करण्याचा प्रकार म्हणजे भारतातील लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम ईडी, सर्वोच्च न्यायालय व निवडणुक आयोगाचे (त्रिसुत्री) षडयंत्रच आहे. ईडीने निवडणुक आचारसंहिता लागल्यानंतर ज्या घोटाळयांशी पवार साहेबांचा तिळमात्र संबंध नाही, त्याबद्दल कपोलकल्पीत न्यायालयीन आदेश आहे, असे मानून ईडीने आरोप दाखल करणेचा केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत.
महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ७८ अन्वये असा गुन्हा ज्या संचालकांच्या काळात प्रत्यक्ष वा अपत्यक्ष बँकेतील गैरव्यवहार शंकास्पद असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री व तपास यंत्रणेची खात्री झाल्यावर अशा संचालकांची पदे रद्द करून पुढील ५ वर्षे सदर बँकेच्या कारभारास अपात्र ठरविले जाते. इथे पवार साहेबांना शिखर बँकेचे सभासद, ना संचालक, मग थेट त्यांना दोषी ठरविणे हा राजकीय सुड उगवण्याचा प्रकार स्पष्ट आहे. आचारसंहिता काळात असे धोरणात्मक निर्णय वा मान्यता नसतानाही हे घडतेय इथेच केंद्र व राज्य सरकारचा डावपेच उघड झाला, तो जनता उधळून लावील, असे या पत्रात शिंदे यांनी म्हटलेले आहे.












