न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- पुणे जिल्हा क्रीडा विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, पिंपरी येथे सुरू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन करीत राज्यस्तरीय संघातील आपले स्थान पक्के केले.
सतरा वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धेत तृतीय क्रमांक आणि चौदा वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सतरा वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धेत समृद्धी ढगे, पुनम मोरया आणि चौदा वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धेत तनिष्का वांजळे, धनश्री पाटील या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय आट्यापाट्या संघाकडून खेळण्यास निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले.












