न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पँथर्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडे सहा जागांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पार्टीचे राज्य अध्यक्ष एन. एम. पवळे यांनी शिष्टमंडळासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबत मागणी करण्यात आली.
औरंगाबाद, केज, श्रीरामपूर, चिंचवड, भिवंडी आणि शिरूर या सहा विधानसभा मतदार संघांची मागणी केली आहे. यातील चिंचवड आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंंघात पँथर्स रिपब्लिकन पार्टीला उमेदवारी देण्यात येईल. बाकी मतदारसंघाबाबत सकारात्मक निर्णय केला जाईल, असे आश्वासन आघाडीतर्फे देण्यात आले असल्याची माहिती पार्टीचे पुुणे जिल्हाध्यक्ष गौतम डोळस यांनी दिली.
डोळस यांनी सांगितले, की लोकसभा निवडणुकीमध्ये पँथर्स रिपब्लिकन पार्टीने काँग्रेस पक्षाला विनाशर्त पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र पार्टीने आघाडीकडे सहा जागांची मागणी केली आहे. आघाडीने गांभीर्याने विचार करून आम्हाला सहा जागा द्याव्यात. यामध्ये चिंचवड आणि औरंगाबादची जागा पँथर्स रिपब्लिकन पार्टीला देण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले आहे.















