न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- अजित पवार यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. याबाबत अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले की, शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं.
ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.
शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही तरीही त्यांचं नाव यामध्ये गोवण्यात आलं. ईडीने शरद पवार यांचं नाव अशासाठी दिलं की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझं आणि शरद पवार यांचं नातं असल्याने ईडीने त्यांचं नाव या प्रकरणात आणलं. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शिखर बँक प्रकरणात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच १२ हजार कोटीपर्यंत आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.












