विरोधी पक्षाकडे विरोधकच नसल्याने आ. जगतापांना हॅटट्रिक मारण्याची सुवर्णसंधी!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यशैलीच्या बळावर भाजपची विजयी घौडदौड सुरु आहे. या विधानसभा मतदारसंघात आजवर आमदार जगताप यांनी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. त्या बळावरच ते सलग दोनवेळा निवडून आले. तसेच, आता हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. सन २००९ च्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ स्थापन झाला. तेव्हा पहिल्यांदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप या मतदार संघातून निवडून आले. विशेष म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी कॉग्रेसचा दबदबा असणाऱ्या या मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही तगडा उमेदवार नाही.
मुळचा चिंचवड विधानसभा मतदारसंघ अनेक गावांचा मिळून तयार झालेला आहे. सध्या या मतदारसंघात आयटीयन्स, उद्योजक, वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग वास्तव्यास आहे. झोपडपट्टीचा नगण्य परिसर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा या बाबींमुळे पिंपरी व भोसरी मतदारसंघाच्या तुलनेत हा मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
सन २००९ च्या विधानसभेसाठी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण जगतापांनी अपक्ष उभे राहून नशिब अजमावलं आणि आघाडीच्या भाऊसाहेब भोईर यांना धोबीपछाड केलं. नंतर लक्ष्मण जगतापांनी स्वगृही परतत २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर व शहराध्यक्षपद मिळाल्यानंतर आ. जगताप यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे दोन आमदार आणि महापालिकेतील सत्तेमुळे शहरात भाजपची ताकद वाढली. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे लोकसभा निवडणकीत या मतदारसंघातून महायुतीला मिळालेलं जवळपास लाखाचे विक्रमी मताधिक्क्य. या यशाचे खरे शिल्पकार अर्थातच भाजपचे आ. तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हेच आहेत.
सध्या वरिष्ठ पातळीवर विधानसभेच्या जागा-वाटपासाठी वाटाघाटी सुरु आहेत. युती होण्याच्या दृष्टीने पाऊले सरकत असली तरी, अद्याप याबाबत काही असे स्पष्ट नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात त्याबाबत स्पष्टता दिसेल. मात्र युती तुटल्यास आ. जगताप यांना अधिकचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण युतीत फूट पडल्यास जगतापांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात असतील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहेच. पण त्यांच्याकडे म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. हा लेखाजोखा पाहता, चिंचवड विधानसभेतून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल व आ. जगताप या स्पर्धेतही बाजी मारतील व तिसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील, असेच म्हणावे लागेल.












