न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
“आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू देत असं यावेळी आदित्य ठाकरेंना सांगितलं.












