न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- अनेक चर्चांनंतर अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे भाजपा-शिवसेनेसह मित्र पक्षांच्या महायुतीची सोमवारी (दि.३०) घोषणा करण्यात आली.
या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
पत्रकात म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्र पक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत.
या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढवणार इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशिर्वाद प्राप्त करेल हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत, असेही या पत्रकामधून स्पष्ट करण्यात आले आहे.












