पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांचे उद्दिष्ट
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची सन २०१८-१९ या वर्षाकरिता ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ३०) रोजी संध्याकाळी ५.०० वा. संघटनेच्या थरमेक्स चौक येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.
या सभेस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, विजय खळदकर, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संजय सातव, दीपक फल्ले, संजय आहेर, शिवाजी साखरे, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे, स्वीकृत संचालक अतुल इनामदार, सुनील शिंदे, शांताराम पिसाळ, विजय भिलवडे, प्रमोद दिवटे, कैलास भिसे, अशोक अगरवाल, निसार सुतार, बशीरभाई तरसगार, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, पांडुरंग वाळूंज, प्रभाकर धनोकार व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला सभेच्या अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची निवड करण्यात आली. त्यासाठी संजय सातव यांनी नाव सुचवले. त्यास विजय खळदकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दिवंगत सभासदांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव प्रमोद राणे यांनी मांडला. सर्वांनी २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहीली. त्या नंतर सभेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरवात करण्यात आली.
त्यानंतर संचालक शिवाजी साखरे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांताचे वाचन केले. सभेने इति वृत्तांत कायम केला. त्यानंतर खजिनदार संजय ववले यांनी सन २०१८-१९ या वर्षाचा ताळेबंद सादर केला. त्यास सभेने बहुमताने मंजुरी दिली. संघटनेने आज पर्यंत केलेल्या महानगरपालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, एम.आय.डी.सी. या संबंधित विविध कामाचा आढावा सचिव जयंत कड यांनी घेतला
माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी टी २०१ पुनर्वसन प्रकल्प, महानगर पालिका, प्राधिकरण यांच्या संदर्भात उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्या बाबत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सन २०१९-२० या वर्षाकरता अंदाजपत्रक मांडले. सभेने त्यास बहुमताने मंजुरी दिली.
उद्योजकांच्या प्रश्न उत्तराचा व अडचणीचा विषय घेण्यात आला. या वेळी सभासदांनी विचारलेल्या विविध स्वरूपाच्या प्रश्नांना संचालक मंडळाने सविस्तर उत्तरे दिली. यामध्ये औद्योगिक आस्थापनांना लावण्यात आलेला शास्तीकर, वाढीव वीजदर, औद्योगिक परिसरात वाढत्या औद्योगिक मालाच्या चोऱ्या, टी -२०१ पुनर्वसन प्रकल्प, एम आय.डी.सी..प्राधिकरण सबंधित प्रश्नांवर चर्चा झाली. या वेळी संघटनेचे भोसरी येथील सभासद श्रीपाद इंटर.चे मालक रावडे यांच्या मुलाचे शास्तीकराच्या धक्याने नुकतेच निधन झाले, अशी वेळ इतर कुणावर येऊ नये म्हणून संघटनेतर्फे शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडली. नंतर अध्यक्ष संदीप बेलसरे यांचे भाषण झाले.
आपल्या भाषणात बेलसरे यांनी संघटनेकडून सध्या केल्या जात असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच संघटनेच्या भावी योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बेलसरे यांनी औद्योगिक आस्थापनांना लावण्यात आलेला शास्तीकर पूर्व लक्षी प्रभावाने रद्द करण्यासाठी संघटना पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगतले. तसेच, वाढीव वीजबिल दर रद्द करण्यासाठी शासनाने महावितरणला अनुदान द्यावे जेणे करून महावितरणला दर वाढ करावी लागणार नाही. penalty लागल्यामुळे अनेक उद्योजकांचे वीज बिल वाढले असून, त्यासाठी आपल्या कंपनीमध्ये नवीन यंत्रणा बसवण्याचे आवाहन बेलसरे यांनी या वेळी उद्योजकांना केले.
संचालक प्रमोद राणे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले .संचालक संजय आहेर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.












