न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी अंतिम केली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पक्षाकडून त्यांना आज दुपारी ठीक तीन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचनाही मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
राष्ट्रवादीने विधानासभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या एकूण दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र या दोन्ही याद्यात चिंचवड व भोसरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत नावांची घोषणा केलेली नाहीत.
ही दोन्ही मतदारसंघ संवेदनशील असल्यामुळेच पक्षनेतृत्वाकडून अद्यापही याबाबत नावांची गुप्तता ठेवण्यात आली आहे. मात्र, चिंचवडमधून पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या नावाबाबत एकमत झाले असून, आज दुपारी ठीक तीन वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आमच्या हाती आले आहे.















