न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रशांत शितोळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत प्रशांत शितोळे अर्ज सादर करण्यासाठी आज गुरुवारी ठीक तीन वाजता प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता, अर्ज सादर करण्याची वेळ संपली असल्याचे कारण देत त्यांना उद्या अर्ज सादर करण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना केल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांच्याबरोबर शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रवक्ता फजल शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांच्याबरोबर वेळेत प्रशासकीय इमारतीच्या आवारात पोहोचलो. मात्र निवडणूक आयोगाचे कार्यालय इमारतीच्या सातव्या मजल्यावर असल्यामुळे आम्हाला कार्यालयात पोहोचायला एक-दोन मिनिटे उशीर झाला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याने आमच्या उमेदवारचा अर्ज घेण्यास मज्जाव करीत उद्या या, असे सांगितले.
मतदान प्रक्रियेतसुद्धा अंतिम क्षणी मतदाराने त्या मतदान केंद्रात प्रवेश केला तर, त्या मतदाराचा हक्क समजून मतदान घेतले जाते. मग हा सवाई निर्णय कोणाच्या सांगण्यावरून अधिकारी घेत आहेत. सत्ताधारी असल्यामुळे प्रशासन त्यांच्या तालावर नाचत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे प्रत्येकाचा काळ बदलत असतो. या निवडणुकीत जनता याची दखल घेईल. तसेच उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उद्या अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.















