- माझा उमेदवारी अर्ज बाद होण्यास पक्षच कारणीभूत
- प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत फोडला टाहो
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- पक्षाने उमेदवारी दिली परंतु एबी फॉर्म वेळेत दिला नाही. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यास पक्षच जबाबदार आहे. याबाबत वरिष्ठांना विचारले मात्र, उत्तर मिळाले नाही. माझ्या बरोबर शहराध्यक्ष संजोग वाघिरे हेही होते. पक्षाने माझ्या बाबतीत अन्याय केला आहे. त्यामुळे मी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे प्रशांत शितोळे म्हणाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला होता. या अर्जाची आज (शनिवारी) छाननी झाली. या अर्जासोबत राष्ट्रवादीने अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम ३३ नुसार हा अर्ज बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.
याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे चिंचवडचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


















