- उपनेते आढळराव, पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशाचे पालन केले म्हणून बंडाची हवा थंड
- आ. लांडगे माझे मोठे बंधू; त्यांच्यासोबत लक्ष्मणासारखी सावली बनून राहणार
- आ. लांडगे यांच्याशी इरफान सय्यद यांचे गुप्तगू
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- महायुती झाली अनं शिवसेनेची हक्काची जागा भाजपकडे गेली. हक्काची जागा भाजपकडे गेल्यामुळे भोसरी-खेड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद नाराज झाले होते. सय्यद यांनी शिवसेना पदाधिकारी व समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष लढण्याबाबत तयारीही केली होती. मात्र, स्वत: शिवसेना उपनेते आढळराव यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मनधरणीनंतर त्यांची नाराजगी दूर झाली. भोसरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार आ. महेश लांडगे हे आता महायुतीचे उमेदवार आहेत. भोसरी मतदारसंघात इरफान सय्यद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच मुस्लीम समाजबांधवांची संख्याही लक्षणीय आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. ४) रोजी महायुतीचे उमेदवार आ. महेश लांडगे यांनी स्वत: इरफान सय्यद यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी चर्चे दरम्यान महेश लांडगे यांनी सय्यद यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला. तसेच त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चांगली तयारी केली होती. सकारात्मक वातावरण निर्मिती झाली होती. मात्र, ‘महायुती’च्या जागावाटप सूत्रानुसार हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला आला आणि मला संधी मिळाली. पण, इरफानभाई आज माझ्यासोबत आहेत. त्यांच्या साथीने भोसरीचा विजय सोपा होणार आहे, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
यावेळी इरफान सय्यद म्हणाले की, पक्षाचा आदेश आपण पाळणार आहोत. त्यामुळेच मी भोसरी मतदारसंघातून माघार घेतली. आजवर पक्षाने मला भरपूर पदं दिली. राहिले आमदारकीचे तर, तेही भविष्यात पूर्ण होईल. राजकीय पुनर्वसन करणार असल्याचा शब्दही मला पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. युती झाल्यामुळे पक्षातील अनेक समर्थक दुखावले गेले आहेत. मी ही दुखावलो गेलो होतो. विरोधी पक्षाकडूनही उमेदवारीच्या ऑफर येत होत्या. मात्र, मी शांत राहत उपनेते आढळराव, पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशाचे पालन केले. बंडाची हवा थंड केली. भाजपचे उमेदवार आ. महेश लांडगे मला लहान बंधू मानतात. ज्याप्रमाणे श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांनी अखेरपर्यंत श्रीरामांची साथसोबत केली, त्याप्रमाणेच मी ही एक लहान बंधू या नात्याने इथूनपुढे आ. महेश लांडगे यांच्याबरोबर त्यांची सावली बनून राहील. तसेच या विधानसभा निवडणुकीत आ. लांडगे यांना लाखाचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी दिवसरात्र एक करीन व युतीधर्माचे पालन करीन.


















