न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
भाजपच्या प्रदेश कार्यालयातून आज (गुरुवारी) याबाबत आदेश निघाला आहे. यात म्हटले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता भाजपा – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण नामांकन पत्र दाखल करुन पक्षविरोधी कृत्य केले आहे.
ही कृती अनुशासन भंग करणारी असून पार्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आपणास पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे. भाजप कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने हा आदेश निघाला आहे.


















