- महेशदादांच्या विकासाच्या मुद्द्यामुळे त्यांच्या भव्य विजयात प्रभाग एकचा राहणार सिंहाचा वाटा
- युवा नेते पांडाभाऊ साने मतदारांच्या वतीने व्यक्त केला विश्वास
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रभाग एकमधील म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, साने चौक येथील रॅली व पदयात्रेला आज गुरुवारी (दि. १७) रोजी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या पदयात्रेत महिलांनी मोठी गर्दी केली होती. महिलांनीही जागोजागी आमदार महेश लांडगे यांचे औक्षण केले. प्रत्येक महिलेच्या हातात कमळाचे चिन्ह असलेले फलक होते. महिलांचा मिळालेला हा प्रतिसाद पाहून आमदार लांडगे भारावून गेले. तसेच महिलांचे आभार मानून निवडणुकीत कमळाचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. या पदयात्रेत युवानेते पांडाभाऊ साने, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नगरसेवक कुंदन गायकवाड, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार महेश लांडगे हे महायुतीचे उमेदवार म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांना महायुतीच्या सर्वपक्षीयांचा पाठिंबा आहे. आ. लांडगे यांच्या रॅलीला व प्रचार पदयात्रांना मतदारसंघात नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लांडगे यांनी आज गुरुवारी सकाळपासूनच चिखलीतील म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, साने चौक या भागात रॅली व पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ‘एकच वादा, महेशदादा’, ‘मनामनाने जपला रे, महेशदादा आपला रे’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
युवा नेता पांडाभाऊ यांनी भोसरी मतदारसंघातील महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आमदार महेशदादांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. ही निवडणूक म्हणजे दुष्ट् प्रवृत्तीविरोधाची लढाई आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांचे चांगले विचार या दुष्ट प्रवृत्तीचा या निवडणुकीत निश्चितपणे पराभव करेल. या प्रभागातील मतदार सुज्ञ आहेत. महेशदादांच्या विकासाच्या मुद्द्यामुळेच पुन्हा एकदा मताधिक्क्याच्या बाबतीतही या मतदारसंघातील प्रभाग एकचा आ. लांडगे यांच्या भव्य विजयात सिंहाचा वाटा असेल, असे सांगितले.












