न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खडकवासला, भोर, वडगावशेरी व खेड-आळंदी या आठ विधानसभा मतदार संघांमध्ये एकुण ४१७ मतदान केंद्रे व १७१६ बुथवर मतदान होणार आहे. त्याकरिता आयुक्तालयातील एकुण तीन पोलिस तीन उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त, ५० निरिक्षक, २१४ सहाय्यक निरिक्षक व उपनिरिक्षक व २४५० इतके पोलिस कर्मचारी उपलब्ध आहेत.
तसेच पोलिस महासंचालकांकडून बंदोबस्ताकामी दोन पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, आठ सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी, १० निरिक्षक, २५ सहाय्यक निरिक्षक, ४४२ कर्मचारी, ८०० होमगार्ड तसेच अधिक ४०० होमगार्ड कर्नाटक राज्याकडून उपलब्ध झाले आहेत. अशा प्रकारे सुमारे ४४११ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस आयुक्त बिष्णोई म्हणाले की, “सीएपीएफ व आरपीएफच्या प्रत्येकी दोन कंपनी बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. मतदान केंद्र व बुथ या ठिकाणी ९९४ पोलिस कर्मचारी व ९६२ होमगार्ड नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ईव्हीएम वाटप केंद्र ४, स्टाँगरूम, संवेदनशील मतदान केंद्र, सीएपीएफ डेव्हलोपमेंट, महसुली सेक्टर १६९, पोलिस सेक्टर ६३, वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतचा बंदोबस्त, नियंत्रण कक्ष स्ट्रायकिंग फोर्स-२, चेक पोस्ट-१२, स्टॅटिक सर्व्हेलन्स टिम-३९, फ्लाईंग स्क्वॉड-३९ असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.”















