न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- २०५, पिंपरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी ने-आण करण्याची तसेच मतदान केंद्रापर्यत सहाय्यता करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली होती. त्यामुळे दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी या निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांसाठी तयार केलेल्या अॅपद्वारे दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाकरीता मतदार केद्राची माहिती, मतदान केंद शोधणे, व्हीलचेअरची मागणी नोंदविणे, इत्यादी कामे करता येतात. चिंचवड विधानसभा मतदार संघात दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी केंद्रापर्यत ने-आण करण्यासाठी मतदानासाठी नियुक्त केलेला कर्मचारी वर्ग सहाय्य करीत होता. तसेच बुथवर पोलीस कर्मचारी दिव्यांग मतदारांना केंद्रापर्यत नेणेकामी मदत करीत होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५२६ दिव्यांग मतदार असून त्यात १२६ अंध, मूकबधीर, कर्णबधिर ९३, अस्थिव्यंग २४६ तर ६१ इतर अपंग आहेत. त्यांचेसाठी ९० व्हिलचेअर, ४ रिक्षा व विशेष कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राधिका हावळ, स्वीप ३ नोडल अधिकारी अण्णा बोदडे आणि PWD नोडल अधिकारी संभाजी ऐवले यांचे मार्गदर्शनातून दिव्यांग मतदांरासाठी अशा प्रकारे काम सुरू होते.


















