न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०१९) :- अयोध्या येथील वादग्रस्त जागेचा निकाल लवकरच लागणार आहे. निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (दि. ५) याबाबतचे आदेश दिले आहेत.
अयोध्या येथील राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्यातील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या जागेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. कोणाच्याही बाजूने निकाल आला तरी कोणीही त्याबाबत निषेध सभा किंवा आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
त्याचसोबत पोलिसांनी आपल्या हद्दीत दररोज कोम्बिग ऑपरेशन तसेच रुट मार्च सुरू केला आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाचे तीन प्लाटून देण्यात आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हाणामारीतील गुन्हेगार तसेच जातीय दंगलीच्यावेळी सक्रिय सहभागी झालेल्या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा एका प्रतिबंधात्मक कारवाईला सुरवात केली आहे.