न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्या निकेतन विद्यालय आणि आणि लेटर फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका गीता येरूणकर, हर्षा बांठिया, तेजल कोळसे पाटील, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
शिक्षिका मनीषा पुराणिक यांनी लहान मुलीची नक्कल करून बाल चिमुकल्यांचे मनोरंजन केले. तसेच शिक्षिका जयश्री गुरव, स्वाती गाडे, प्रिया मेनन यांनी गीते सादर करीत कार्यक्रमात आनंद भरला. तसेच शिक्षिकांनी ‘इतनी सी हसी जुबिडुबी जुबिडुबी’ या गीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांना बॅचेस व टॅटू काढण्यात आले. याबरोबरच खाऊवाटपही करण्यात आले. सीमा लड्डा यांनी विविध खेळ घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
पूर्वप्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. चिमुकल्यांनी पोलीस, जवान, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोस्टमन आदींची वेशभूषा केली होती. तसेच मोटू-पतलू, डोरेमॉन, छोटा भीम, स्पायडरमॅन, सूर्य, चंद्र, तारे, इंद्रधनू, वृक्ष, पाने, फुले अशी वेशभूषा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेत धमाल केली. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेण्यात आले. दर्शन खराडे या विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त करीत बालदिनाचे महत्त्व विशद केले.
विद्यार्थी संकर्षण वरेकर व मयुरेश भगत यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितली. तसेच पाचवीतील विद्यार्थिनींनी ‘गोरे गोरे पान, नेहरू आमचे पंतप्रधान’ हे गीत गायले. शिक्षिका अंकिता सपकाळे यांनी पंडित नेहरूंचे जीवन व फुले व मुले याविषयी माहिती दिली. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित घेण्यात आली. शिक्षिका हरिदीनी निर्मळ यांनी खास मुलांसाठी विविध आकाराच्या कार्टूनच्या कागदी प्रतिकृती तयार केल्या होत्या, चिमुकल्यांसाठी ते खास आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी कॅटवॉक व रॅम्पवॉकही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ज्ञानदा देसाई, शिक्षिका मंगल आढाव, श्रुती तावरे, अंकिता सपकाळे यांनी केले. सोनाली आवळे यांनी आभार मानले.