न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आठवड्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना आज कशी जाग आली? मावळचे खासदार असताना त्यांना इतके दिवस पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी का लावता आला नाही, असा प्रश्न महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
खा. बारणे यांनी पाणीप्रश्नावरून आयुक्तांसह प्रशासनावर सडकून टीका केली. त्यास उत्तरे देताना ते बोलत होते. पवार म्हणाले की, पाणी प्रश्नावर सत्ताधारी भाजप गंभीर आहे. शहराध्यक्ष जगताप यांनी आठवड्यापूर्वी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या आहेत. खा. बारणे यांना अचानक पाण्यावरून कशी काय जाग आली? त्यांनी आपली भूमिका का बदलली, असा खोचक सवाल त्यांनी केला. पाणीपुरवठ्यासंदर्भातील गेल्या २ वर्षांतील सर्व कामांची चौकशीची मागणी बारणे यांनी केली. कोणत्याही चौकशीला भाजप घाबरत नसून, त्यांनी केलेल्या १५ वर्षांतील कामांची चौकशी लावावी, असे पवार यांनी उत्तर दिले.
पाणी प्रश्नावर सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा झाली आहे. आंद्रा – भामा आसखेड धरण पाणी योजनेचे फेरआरक्षण भाजपने पुन्हा मंजूर करून घेतले. तसेच, पुणे महापालिकेच्या वाघोली प्रकल्पातील ३० एमएलडी पाणी शहराला मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पवना जलवाहिनीचा इतके दिवस भिजत पडलेला प्रश्न खासदार असूनही त्यांना सोडविता आला नाही. तो प्रश्नही भाजप मार्गी लावणार आहे, असा दावा त्यांनी केला. डोळ्यासमोर ‘ व्हिजन ‘ ठेवून भाजप काम करीत असून, येत्या महापालिका निवडणुकीपर्यंत पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.















