न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०१९) :- चिखली ग्रामपंचायतमध्ये तुकाराम बन्सी बिडकर हे कार्यरत होते. (दि. २८ / ०२ / २००७) मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून शिपाई पदावरुन सेवानिवृत्त झाले. परंतु, त्यांना आजतागायत सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मिळाला नव्हता. त्यांनी महापौर राहुल जाधव यांचेकडे मदतीची याचना केली. त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या लाभासंबंधी महापौर राहुल जाधव यांनी जातीने लक्ष घालून पाठपुरावा सुरु केला व आज अखेर त्यांना सेवानिवृत्ती वेतनाचे सर्व लाभ मिळवून दिले.
गाव ते महानगर असा प्रवास करणा-या पिंपरी चिंचवडमध्ये (११ सप्टेंबर १९९७) रोजी हद्दीलगत असणारी १४ गावे समाविष्ट झाली. त्यामध्ये दापोडी, बोपखेल, दिघी, च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, रूपीनगर, रावेत, पुनावळे, वाकडचा समावेश होता. दापोडी हे गाव पूर्वी पुणे महानगरपालिकेत होते. तर, अन्य गावे पुणे जिल्हा परिषदेतून महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेंव्हापासून चिखली ग्रामपंचायतीचा कारभार हा महानगरपालिकेच्या ताब्यात आला.
पूर्वीच्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी तुकाराम बन्सी बिडकर हे देखील शिपाई पदावर महानगरपालिकेत रुजू झाले. त्यांच्या पत्नी श्रीम. जिजाबाई तुकाराम बिडकर हया चिखली ग्रामपंचायतीच्या सदस्या देखील राहिलेल्या आहेत. नियत वयोमानानुसार (दि. २८ / ०२ / २००७) रोजी ते सेवानिवृत्त झाले परंतु, त्यांना सेवानिवृत्ती वेतनाचे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोणतेही लाभ मिळालेले नव्हते. अखेर त्यांनी महापौर राहुल जाधव यांचेकडे गा-हाणे मांडले. महापौरांनी देखील सदर बाबीची तात्काळ दखल घेत प्रशासनाकडे जातीने पाठपुरावा करत आज अखेर त्यांना न्याय मिळवून दिला. आज तुकाराम बन्सी बिडकर हे त्यांचे संपूर्ण कुटुंबिय व भाचे कुंदन बाजीराव निकम यांच्या समवेत महापौर दालनात महापौर राहुल जाधव यांचे आभार मानन्याकरिता आले होते. त्यावेळी त्यांनी सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम रु. १२, ४५, ०८८ / – मिळवून देण्याकामी पाठपुरावा केल्याबाबत महापौरांचे आभार मानून मनातील भावना व्यक्त केल्या. एखाद्यास न्याय मिळवून देता आला याचे समाधान महापौरांच्या चेह-यावर झळकत होते.












