- आयुक्तसाहेब उत्तर द्या, अन्यथा राजीनामा द्या…
- राष्ट्रवादीच्या संदीप काटेंचा आयुक्तांना सवाल….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. जुलै २०२० पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. तरीही पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येत्या २१ नोव्हेंबर पासून दिवसाआड पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तशी भूमिका पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. पवना धरण परिसरात भरपूर पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधा-यातून पाणी उचलण्यात येते. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे बंधनकारक असताना देखील प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आडमुठे धोरण अवलंबिले आहे. हे आडमुठे धोरण कोणाच्या इशाऱ्यावरून आयुक्तांनी घेतले. त्यांचा बोलविता धनी कोण? आयुक्तसाहेब उत्तर द्या, अन्यथा राजीनामा द्या. शहरावर कृत्रिम पाणीटंचाई लादण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या या धोरणाचा एक पिंपरी चिंचवडकर या नात्याने मी जाहीर निषेध करतो. येत्या काही दिवसात दिवसा आड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्या. अन्यथा तुमच्या या निर्णयाने शहरावर पाणी संकट ओढवल्यास शहरातील एक जबाबदार नागरिक या नात्याने पुढील होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत संदीप काटे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग राहतो. तसेच बहुमजली सोसायट्या मोठ्या प्रमाणात शहरात आहेत. आधीच एक दिवसीय पाणीकपातीच्या निर्णयाने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात आता दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वटहुकुमामुळे शहरातील नागरिकांची ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय’.. अशी अवस्था प्रशासनाने करून ठेवली आहे. आधीच पवना धरण जवळपास १०० टक्के भरले असतानाही शहराला पाणीपुरवठा सुरळीत नाही, ही घटना शहरात प्रथमच घडत आहे. भर पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागले. टँकरवाले नागरिकांना लुटण्याचा प्रकार करतात. त्या टँकरवाल्यांना पोसण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे का?”
पालिका प्रशासनाने जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये. २४×७ च्या पाणीपुरवठा योजनेसाठी सव्वाशे कोटींची निविदा काढून देखील ते काम वेळेत काम पूर्ण झाले नाही. प्रशासनाने ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. तसेच अमृत योजना आणि जेएनएनयुआरएम अंतर्गत देखील कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. पण यातूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. हा प्रशासनाचा नाकर्तेपणा? पिंपरी चिंचवड शहर व मावळ मधील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील १०० टक्के भरलेले आहे. सध्यस्थितीत पाणी मुबलक असल्याने पाणी कपातीला आमचा विरोध आहे. पाण्यावरुन आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. त्यामुळे सर्व भागात समान पाणीपुरवठा करावा. महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे. अनधिकृत नळजोड मोहिम अधिक तीव्र करावी, पाणीगळती रोखण्यावर भर द्यावा. जेणेकरून शहरातील पाणीसंकट दूर करून शहरातील नागरिकांना पाणी मुबलक उपलब्ध होईल. शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा होणे हा त्यांना लोकशाहीने दिलेला हक्क असून, त्या हक्कावर गदा येणार असेल, तर पुढील काळात टोकाची भूमिका घ्यावी लागेल. महापलिका आयुक्तांनी तत्काळ हालचाली करून दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा मागे घ्यावी. तसेच सध्याचा एक दिवसीय पाणीपुरवठा बंद करून, तो पूर्वरत करावा, असे संदीप काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















