- येत्या २५ नोव्हेंबरपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विधानसभा निवडणुक संपल्यानंतर जनतेत गोंधळ उडू नये म्हणून पाणी कपातीबाबत कोणतीच चर्चा केली नव्हती. आता २५ नोव्हेंबर पासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे आजमितीला पवना धरण १०० टक्के भरलेले असताना देखील महापालिका प्रशासनाकडून हा अप्रिय घेण्यात आला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज मंगळवारी (दि. १९) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त म्हणाले की, येत्या २५ नोव्हेंबर पासून शहरात महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. पाणी उपलब्धता वाढवणे व समन्यायीन पाणी वाढवणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल. शहरात पाणी टंचाई नसली तरी पाण्याचा समतोल राखला जाईल. याबाबत पाणीपुरवठा विभागाला आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी शहरातील नागरिकांना केले आहे.















