- आयुक्तांच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यावर भाजपची मान्यतेची मोहर!
- सभागृह नेत्यांनी ओतलं आगीत तेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब व नोव्हेंबर महिन्याची नियमित सभा आज बुधवारी (दि. २०) रोजी आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणीप्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. पाणी विषयावरून सत्ताधारी व विरोधकांनी तब्बल चार तास चर्चा केली. चर्चेदरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत अतिमतः विरोधकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत महापौर जाधव यांनी आयुक्ताच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यावर मान्यतेची मोहर उमठविली.
चर्चेला माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सुरुवात करीत, शहरातील पाणी प्रश्नाला सत्ताधारी व प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी सरासरीपेक्षा १२७ टक्क्यांहून जास्त पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. आजही मागील वर्षीपेक्षा १७ टक्के जास्त जलसाठा म्हणजेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवाडीनुसार धरण पूर्ण भरलेले आहे. जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे सोडण्यात आले. मुबलक पाणीसाठा असतानाही पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि. २०) रोजी दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली. आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून चुकीचे निर्णय घेऊन नागरिकांना वेठीस धरण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय शिवसेनेचे राहुल कलाटे, सचिन भोसले, अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादीच्या मंगला बनसोडे, राजू बनसोडे, भाजपचे नितीन काळजे, एकनाथ पवार, मनसेचे सचिन चिखले आदींनी या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोधकांचा विरोध डावलून आयुक्तांच्या पाणीकपातीच्या निर्णयाचे समर्थन केले. भविष्यातील २५ वर्षाचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील. आयुक्तांनी तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी दिवसाआड पाणी देण्याचा उपाय सुचविला आहे. यासाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले. तसेच २५ नोव्हेंबरपासून शहरात दिवसाआड पाणी देण्याच्या आयुक्तांच्या निर्णायास मान्यता दिली.
सभागृह नेत्यांनी ओतलं आगीत तेल…
चर्चेदरम्यान पाणी विषयावरून महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी काही नगरसेवक पाणी प्रश्नावरून स्टंटबाजी करीत असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच सत्ताबदलाची हवा दिसताच आम्ही वाटेल ते करू शकतो, असे त्यांना वाटत असल्याचे म्हटले. यावरून सभाग्रहात गोंधळ माजला. त्यांचा रोख शिवसेना व राष्ट्रवादीकडे होता. त्यावेळी या विषयावर माजी महापौर मंगला कदम व गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांकडे बोलू देण्याची मागणी केली. मंगला कदम यांनी जागेवरूनच बोलू द्या, अशी विनंती केली. मात्र, महापौर जाधव यांनी खाली बसण्यास सांगितले. तसेच तुम्ही आम्हाला आदेश द्यायचे नाहीत, अशी कान उघडणी केली. मंगला कदम यांनी तसेच उभे राहत, गणसंख्या अपुरी असल्याकडे महापौरांचे लक्ष वेधले. मात्र महापौरांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत सभागृहाचे काम रेटून नेले.















