न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले हे मानवी हक्कांसाठी अहोरात्र झगडले, जोतीरावांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता (भाऊपणा व बहीणपणा), शिक्षण, जातीनिर्मुलन, स्त्री-पुरुषसमता, शेती व शेतकरी यांचा सर्वांगीण विकास, महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक संघटन, मानवी हक्कांसाठी जागृती आणि संघर्ष यासाठी अभूतपुर्व योगदान दिले, असे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कविचंद भाट यांनी सांगितले.
थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 28 नोव्हेंबर) पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळे, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.
भाट म्हणाले की, महात्मा फुलेंना शिक्षणविषयक कामाला प्रतिगामी विचारांच्या मंडळीनी खूप विरोध केला. तरीही जोतीराव व त्यांचे सहकारी डगमगले नाहीत. वडिलांनी सामाजिक विरोधामुळे जोतीरावांना घराबाहेर काढले. त्यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाईंनी आपले शिक्षणाचे ‘मिशन’ चालू ठेवले. त्यांचा ध्येयवाद आणि त्यांची तळमळ अजोड होती. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धूराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. या शैक्षणिक चळवळीत लहूजी वस्ताद साळवे आणि राणबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आणि सहकारी सहभागी होते.
१८५५ साली त्यांनी पुण्यात गंज पेठेत (महात्मा फुले पेठ) राहत्या घरी देशातील पहिले प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. ही साक्षरता अभियानाची सुरुवात होती. मुलामुलींच्या शैक्षणिक गळतीच्या मुळाशी दारिद्रय, पालकांची निरक्षरता, अंधश्रध्दा, शिक्षणापासून काय लाभ व सुखे असतात याचा परिचय नसणे आदी कारणे असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी त्यानी उपाय योजले. ते गरीब मुलामुलींना विद्यावेतन देत असत. शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता.
‘दि पूना ऑब्झर्व्हर ॲण्ड डेक्कन वीकली’ या वृत्तपत्राने त्यांचे काम म्हणजे ‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’ असे वर्णन केले होते. त्यावेळी मुलींच्या शाळांच्या परीक्षा बघायला पूना कॉलेजच्या प्रांगणात ३००० जमले होते आणि त्याहून अधिक गर्दी बाहेर होती असे वर्णन शिक्षणखात्याच्या अहवालात मिळते.
जोतीरावांनी शिक्षणाच्या झिरपत्या सिध्दान्ताला विरोध केला आणि समाजातल्या तळागाळापासून शिक्षणाची सुरुवात केली पाहिजे याचा आग्रह धरला. विधवांना त्या काळात पुनर्विवाहाची बंदी होती. केशवपन करावे लागत होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विधवाविवाह घडवून आणले आणि केशवपन करु नये यासाठी नाभिक बांधवांचे प्रबोधन करुन त्यांचा केशवपनविरोधी संप घडवून आणला. विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी १८६३ साली त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.
स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर त्यांनी पूर्वास्पृश्य बांधवांसाठी खुली केली. सत्यशोधक विवाह पध्दतीची सुरुवात करुन हुंडा, लग्नातील डामडौल व अमाप खर्च यांना प्रतिबंध केला. कमी खर्चातील सत्यशोधक विवाह घडवून आणले. या लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्त्रियांच्या ‘मानवी अधिकारासाठी’ झटण्याची शपथ नवरा मुलगा घेत असल्याचे मनूद केले. १४० वर्षापूर्वी आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळीला अर्पण केला होता.
जोतीरावांनी ‘शेतक-याच्या आसुड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पीकपध्दती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पध्दतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला, अशा नोंदी महात्मा फुले समग्र वाड्.मयात आहेत.
महात्मा फुले यांच्या शिक्षण, शेती, सामाजिक समता, सत्यशोधक समाज या कार्याविषयी आजच्या युवा पिढीने माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य अभ्यासावे अशी अपेक्षा कविचंद भाट यांनी यावेळी व्यक्त केली.















