न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ अंतर्गत मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीमधील संत तुकाराम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या संगिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन दिवस झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालय, पिंपरी (मुली) या संघाने शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती (मुली) या संघावर १ विरुध्द ० असा एक गुणांनी विजय मिळविला. तर चिंचवड मधील प्रतिभा महाविद्यालयाने तिसरा क्रमांक मिळविला. रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) स्पर्धेचा बक्षिस वितरण सभारंभ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक अमरनाथ कांबळे, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेश सावंत, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार पोपटराव देवकर, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. शोभा शिंदे, शकुर सय्यद, प्राचार्य डॉ. विकास पवार, पुणे जिल्हा क्रिडा विभाग सह सचिव डॉ. पांडूरंग लोहोटे, प्रा. डॉ. रमेश गायकवाड व सर्व संघ व्यवस्थापक उपस्थित होते. सर्व विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.















