- जलवाहिनी फुटल्यामुळे वाहतूक नियमनासाठी सुरक्षा समितीच्या सदस्यांची मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- आकुर्डी खंडोबा माळ ते रामनगर चौक रस्त्यावर कामगारांच्या वाहनांची वर्दळ दुतर्फा वाढलेली होती. सोमवारी (दि. ९) रोजी संध्याकाळचे सहा वाजले होते, नुकत्याच कंपन्यांची सुटण्याची वेळ झाली होती. अचानक युवराज मोटर्स या चार चाकी सर्व्हिस गॅरेज जवळ मोठा आवाज झाला व पाणी पुरवठा जलवाहिनी फुटली, सदरची वाहिनी फुटण्याची घटना एवढी मोठी होती की रस्त्याचा ४० इंचापेक्षा जास्त जाड थर फुटला, रस्ताच्या डांबरीकरणास २० फुटापेक्षा जास्त लांबीची भेगच पडली. ह्यामुळे मोठ्या प्रमाणात जलवाहिनेचे पाणी बाहेर पडू लागले. हे घडत असताना त्या रस्त्यावरून जात असलेले प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समीती चे कार्यकर्ते व बिजलीनगर विभागाचे संघटक प्रशांत शिंपी यांना सदरची बाब निदर्शनास आली.
त्यांनी त्वरित समिती चे अध्यक्ष विजय पाटील यांना याबाबत कळविले. त्यानंतर प्रशांत शिंपी यांनी संभाव्य त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघाती धोका ओळखून रामनगर कडे जाणारी सर्व वाहतूक वळवली व दुचाकी आणि चार चाकी वाहनांना थांबवून जलवाहिनी फुटून रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. थोड्याच वेळात समिती अध्यक्ष विजय पाटील, सतीश देशमुख, बाबासाहेब घाळी, अमित डांगे, अमोल कानु हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने खंडोबा मंदिर परिसरातील पाणी पुरवठा टाकीजवळील विभागातील कामगारांना याबाबत सूचित केले, परंतु सदर बाब कोणीही तातडीने गांभिर्याने न घेतल्यामुळे लाखो लिटर पाणी जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेले. तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांची एकच धावपळ उडाली.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु अश्या चुकीच्या पाणी पुरवठा नियमनामुळे शहरात जागोजागी पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे जलवाहिण्या फुटण्याच्या घटना वाढलेल्या आहेत.गेल्या आठवड्याभरात पिंपरी चिंचवड शहरात १४ पेक्षा जास्त ठिकाणी जलवाहिन्या फुटून पाणी गळती झालेली आहे.अश्या पद्धतीने जलवाहिण्याची तपासणी न करता, तसेच पाणी दबाव यंत्रणेची पाहणी न करता पुरवठा करणे अयोग्यच ठरते त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीण्यांची तांत्रिक बाब न तपासता अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.”















