न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- बोपखेलमधून दापोडीकडे जाणाऱ्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमधील ( सीएमई ) रस्ता पूर्वीप्रमाणे वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी बोपखेलच्या नागरिकांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी तब्बल १९० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी बोपखेल गाव विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रीरंग धोदाडे, अनिल बेनाडे, अशोक बाराथे, प्रतिक्षा घुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन पाठविले आहे. सीएमईने अचानक नागरिकांसाठी रस्ता बंद केला. त्यामुळे नागरिकांना १० ते १२ किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये – जा करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २५ मे २०१५ रोजी रस्ता खुला करण्यासाठी आंदोलन केले. जमाव हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
याप्रकरणी पोलिसांनी १९० नागरिकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यांना वारंवार पोलीस ठाणे व न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे या नागरिकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.















