न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्याबाबत महापालिकेबरोबर राज्य सरकारने बैठक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नुकतेच पुणे येथे आगमन झाले. त्यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पिंपरीतील समस्येबाबत निवेदन दिले. शहरातील पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा साडेबारा
टक्के परव्याचा प्रश्न मार्गी लागला आहे, मात्र, अद्याप त्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला नाही. तो अध्यादेश काढावा. शहरात सध्या पिण्याच्या पाणी टंचाई व अनियमिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत आपण राज्य सरकार व महापालिकेची बैठक लावावी.
पिण्याच्या पाण्याची ४० टक्के होणारी गळती थांबवावी व वितरण व्यवस्था नीट करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरात अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रखडले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा. एमआयडीसीच्या शंभर एकर जागेवर झोपडपट्ट्या आहेत. त्यांचे जागेवरच पुनर्वसन करावे. शहरात एसआरए ( झोपडपट्टी पुनर्वसन योजना ) कडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात एकही एसआरए योजना झालेली नाही.















