न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ३० दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पांसाठी कालावधी लागणार आहे.
सध्या तरी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी – चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने तत्त्वत: मान्य केली केली आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना येत्या दोन महिन्यात पूर्ण झाल्यावर ‘वाघोली’ योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरीत करण्यास पुणे महापालिकेने संमती दिली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
महापालिकेची टप्पा क्रमांक ४ ही योजना अद्याप कार्यान्वित नसल्याने ४.८४ टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे जादा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधा-यातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. २७ एमएलडी क्षमतेच्या या योजनेद्वारे चिखली येथील ४० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाकीद्वारे पुणे महापालिका हद्दीतील गणेशनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, खराडी, खांदवेनगर या भांगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे २७ एमएलडी क्षमतेची वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेकडे केली आहे.















