न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व हवेलीचे माजी आमदार अशोक कल्याणराव तापकीर (वय ७०) यांचे काल (मंगळवारी) रात्री आठच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.
अशोकराव तापकीर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे ते बंधू होत. ब्रेन हॅमरेज आणि अर्धांगवायूच्या आजाराशी ते अनेक वर्षे झुंजत होते. अशोकराव तापकीर यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी ११ वाजता चऱ्होली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशोकराव तापकीर हे हवेली विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. १९८५ ते १९९० या काळात त्यांनी विधानसभेत पिंपरी-चिंचवडसह हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. एक तरुण, कर्तबगार, अभ्यासू आमदार असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. उत्तम वक्तृत्वाने त्यांनी अनेक सभा गाजविल्या होत्या.
एक अभ्यासू, दिलदार वृत्तीचे, संवेदनशील मनाचे प्रामाणिक नेतृत्व अनेक वर्षे प्रवाहापासून अलिप्त राहिले. सामान्य माणसासाठी त्यांच्या अंतःकरणात कायम ओलावा असे, तळमळ असे. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. असा मनओल्या हृदयाचा आणि सच्चा दिलाचा एक कर्तबगार नेता काळाने हिरावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी आदरांजली अर्पण केली.















