- राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाची राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांना नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका कामगार संघटनेची निवडणूक येत्या ११ जानेवारीला जाहीर करण्यात आली आहे. तथापि, नवीन सभासद नोंदणीचा अभाव, निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन हरकती – सूचना न मागविणे या लेखी मुद्दयांवर हरकत घेत राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
तीन दिवसांच्या कालावधीत या तक्रारीची चौकशी करुन ‘ अॅक्शन टेकन रिपोर्ट ‘ सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश अनुसुचित न्यायालयाने नुकताच दिला आहे. तसेच कर्मचारी संघटनेचा संपूर्ण ताबा आणि सर्व आर्थिक व्यवहार राज्याच्या ताब्यात घेऊन प्रशासकांनी पढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर सुमारे २० वर्षानंतर येत्या ११ जानेवारी रोजी नवीन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक प्रक्रीया होत आहे. दरम्यान, सुमारे १ हजार ७४३ कामगारांनी निवडणूक प्रक्रियेवर तीव्र हरकत नोंदविली आहे. तसेच, याबाबतची लेखी तक्रार अॅड. सागर चरण यांच्याकडे केली. याबाबत माहिती देताना अॅड. सागर चरण म्हणाले की, निवडणूक जाहीर करण्यापूर्वी नवीन सभासद नोंदणी करुन सभासद यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. तसेच, त्यावर हरकत – सूचना मागविणेही क्रमप्राप्त आहे. ११ जानेवारी रोजी दुसरा शनिवार असल्याने कामगारांना सुटी आहे. सुटीच्या दिवशी मतदान प्रक्रियेवरही कामगारांनी हरकत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे धाव घेत तक्रार केली. त्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजावली आहे. कामगारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन तीन दिवसात अहवाल सादर न केल्यास कारवाई करु, असा इशारा दिला आहे.















