न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आला आहे. यावरुन राज्यात राजकारण पेटले असून यावर बोलताना खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी भाजपावर निशाणा साधला. अशा प्रकारे निर्णय घेत भाजपा द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आळंदी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
कोल्हे म्हणाले, चित्ररथ नाकारल्याने शंका येण्यासारखी जागा आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचे चित्ररथ नाकारण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा चित्ररथ लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत.
आपल्या राज्याचा चित्ररथ हा प्रजासत्ताक दिनी राजपथावरुन जाणं ही अभिमानाची गोष्ट असायची. मात्र, तो का नाकारण्यात येत आहे, याविषयी खरोखर संभ्रम आहे. यामध्ये द्वेषाचे राजकारण तर नाही ना असा संशय निर्माण होत आहे, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.












