न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनी चिंचवडच्या शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाला मानवंदना
स्वतंत्र भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनी चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रती आपली कृतज्ञता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास बी.व्ही.जी. ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर तथा उद्योगपती मा. श्री. हणमंतराव गायकवाड आणि भगवती स्टील कॉर्पोरेशन लिमिटेडचे मा. श्री. आबासाहेब नागरगोजे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासाहेब जाधव तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. जगदीश जाधव, सचिव श्री. संजय जाधव, संचालक श्री. विजय जाधव, हणमंत यादव , पुजा कुलकर्णी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळाराम पाटील, सौ. प्रतिभा देशपांडे, पालक संघाच्या प्रतिनिधी सौ. हर्षदा दुर्गुडे, सौ. भारती धनवे, रामदास थोरात आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यालयाच्या शाहूनगर येथील क्षात्रवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर विद्यालयातील बालवर्ग ते इ. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कार्यक्रम सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या सुमधुर स्वरात ध्वजगीत सादर केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलनातून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. त्यापाठोपाठ विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण मास पी.टी.च्या तालबद्ध कवायत प्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुमधुर स्वागतगीताच्या माध्यमातून करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. रोप मल्लखांब, लाकडी मल्लखांब, जीम्नास्टिक्स या क्रीडा प्रकारांतील रोमहर्षक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली आणि टाळ्यांच्या नाद-सुरात उपस्थितांकडून दाद मिळविली. महाराष्ट्राचा पारंपारिक वारसा असलेल्या आणि अस्सल मराठमोळ्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या लेझीमची तालबद्ध प्रात्यक्षिके पाहून सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक कौतुक केले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच विद्यार्थ्यांचे विविध नृत्य, गाणी आणि बासरीवादन यांचा सर्व उपस्थितांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सदर प्रसंगी क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीतील यशस्वी खेळाडूंचा आणि विविध शालाबाह्य परीक्षा व स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्याचा पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयातील गुणवंत शिक्षक श्री. भाऊसाहेब पगार , सौ.संध्या दरंदले, सौ. प्रतिभा साबळे तसेच विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्पोकन इंग्लिशचे विनामुल्य प्रशिक्षण देणाऱ्या पुजा कुलकर्णी यांचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे हणमंतराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे मनापासून कौतुक केले. त्यांनी या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी वाटचाल करण्याच्या दृष्टीने यथोचित मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा.आण्णासाहेब जाधव यांच्या स्वप्नातून आणि सकारात्मक प्रयत्नांतून यशस्वी वाटचाल करत असलेल्या या शाळेचे भवितव्य उज्वल असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आण्णासाहेबांच्या सकारात्मक आणि समाजसेवी विचारांचे आणि त्यातून निर्माण झालेल्या फलिताचे त्यांनी मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता अण्णांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नांतून निर्मित आधुनिक मॉडेल्सयुक्त विविध विषयांच्या प्रयोगशाळांचे आणि सर्व शैक्षणिक आणि भौतिक सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच याहीपेक्षा आणखी उंच गगनझेप घेऊन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आव्हान केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
आबासाहेब नागरगोजे यांनी आपल्या मनोगतात संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सादर केलेल्या सर्व कार्यक्रमांचे गोड शब्दांत कौतुक केले. सदर कार्यक्रमातील प्रात्यक्षिकांचे संयोजन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. लीला मुटकुळे, श्रीमती मुबारक मोमीन आणि क्रीडाशिक्षक श्री. शब्बीर मोमीन, श्री. भाऊसाहेब पगार व सर्व शिक्षक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचलन सौ. ज्योती क्षीरसागर यांनी केले.