- राहुल कलाटे यांची स्थायी सभेत मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यात येणाऱ्या पाच जागा जागांपैकी वाकड येथील जागा देण्यास शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी स्थायी समितीत विरोध केला. ती एक जागा वगळण्याची मागणी त्यांनी लावून धरली. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी हा विषय तहकूब केला. पुढील सभेत या विषयाला मंजुरी देऊन पालिका सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी शिफारस केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. २९) रोजी झाली. अध्यक्षस्थानी मडिगेरी होते. विषयपत्रिकेवर कामगार कल्याण मंडळास शहरातील पाच ठिकाणच्या जागा देण्याचा प्रस्ताव आला. त्यावर शिवसेना गटनेते कलाटे यांनी आक्षेप घेतला. वाकड येथील जागा विकासकामासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे वाकड येथील जागा देण्यास त्यांनी विरोध दर्शविला. वाकडची ती जागा वगळून इतर ठिकाणच्या ४ जागा मंडळास देण्यात हरकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसे न केल्यास विरोध नोंदवून विषय मंजूर करा, अशी सूचना त्यांनी केली.
त्यावर मडिगेरी म्हणाले की, सर्व पाच जागा कामगार कल्याण मंडळास देण्यात येणार आहेत. पालिका अधिकारी, मंडळाच्या प्रतिनिधींसोबत त्या सर्व जागा मी स्वतः पाहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना जागा देणे गरजेचे आहे. कलाटे यांनी विरोध केल्याने तो विषय तुर्तास तहकूब करण्यात आला. पुढील सभेत तो मंजूर केला जाईल. अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली जाईल. पालिका सभेनंतर मंडळास जागा देण्याचा अडसर दूर होणार आहे, असे मडिगेरी यांनी स्पष्ट केले.















