- महावितरणाने कारभार सुधारावा अन्यथा टाळकुटो आंदोलन
- माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा महावितरणास निर्वाणीचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील ज्योतीबानगर, तापकीरनगर, श्रीनगरमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. काही वेळा या भागात २४ ते ३६ तास वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेचा असहकार इतका वाढला आहे की, मोबाइल चार्ज करण्याइतकाही वीजपुरवठा या भागात होत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, महावितरणाच्या कारभारावर ताशेरे ओढणारी वक्तव्ये या भागातील रहिवाशांकडून केली जात आहेत. या प्रश्नी ‘महावितरण’ कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतापाचा उद्रेक होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येत्या १५ दिवसात उपाययोजना कराव्यात अन्यथा पिंपरीतील महावितरण कार्यालायात टाळकुटो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी निवेदनाद्वारे पिंपरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंते यांना दिला आहे.
महावितरण कार्यालयास दिलेल्या निवेदनात तापकीर यांनी म्हटले आहे की, ज्योतीबानगर, तापकीरनगर, श्रीनगर परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे या भागात महावितरणविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. काही दिवसात १० वी, १२ वी च्या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा आधीचाच ताण, त्यात हा विजेचा लपंडाव त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. पालकही मेटाकुटीला आले आहेत. आठवड्यातून तीन ते चार दिवस विजेचा लपंडाव ठरलेलाच आहे. दिवसा आणि रात्रीच्या २४ तासांत मिळून वीजग्राहकांना केवळ ३ तास वीज पुरवठा मिळत आहे. वीज पुरवठ्याअभावी वीजेवर आधारीत लघू व्यवसाय ठप्प झाले असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात कामगारांचे वास्तव्य अधिक आहे. कामगारांना तीन पाळीत काम करावे लागते. त्यांना डबा देण्याचे काम गृहिणींना करावे लागते. अनियमित वीज पुरवठ्याने त्या त्रस्त झाल्या आहेत. फेब्रुवारी सुरू होताच उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे वृद्ध, लहान मुले यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विजेची समस्या निकाली काढण्यासाठी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु, त्याची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. वीज जाण्याचे कारण काय? या प्रश्नाला केवळ आमचा काहीही दोष नाही, असे उत्तर महावितरणाकडून देण्यात येत आहे.
महावितरणकडून जबाबदारपूर्वक काम व्हावे. संबंधित विभागाने आपली जबाबदारी पूर्ण करावी. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विजेचा दाब कमी अधिक होतो. त्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होत आहेत. यापुढे वीजप्रवाह खंडित झाल्यास, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील विद्युतपुरवठा १५ दिवसात सुस्थितीत आणि सुरळीत ठेवून सहकार्य करावे. अन्यथा पिंपरीतील महावितरण कार्यालयात त्रस्त रहिवास्यांना बरोबर घेऊन टाळकुटो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तापकीर यांनी या निवेदनाद्वारे महावितरणास दिला आहे.












