- प्राधिकरणाचा कारभार पुन्हा विभागीय आयुक्तांकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) कारभार ‘महाविकास आघाडी सरकारने’ पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे सोमवारी (दि. ३) रोजी सोपविला आहे. सदाशिव खाडे यांच्याऐवजी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे राज्य सरकारने प्राधिकरणाचा कारभार दिला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आता प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागाने परिपत्रक जारी केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवड नवनगर हद्दीतील जागा संपादन, विकास व वितरण करणे यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये कलम ११३ च्या पोटकलम ( २ ) व ( ६ ) खाली शासन अधिसूचना, नगर विकास, सार्वजनिक आरोग्य व गहनिर्माण विभाग क्रमांक आरपीपी – ११७० / १६३१९ / आरपीसी, दिनांक १४. ०३. १९७२ अन्वये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य असलेल्या पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. ज्याअर्थी, शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक – पीसीएन – ३०१३ / प्र . क्र . ५८ / नवि – २२ , दिनांक २१ . ०१ . २०१३ अन्वये या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली होती.
या अधिसूचनेन्वये अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्याअर्थी शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. क्रमांक – पीसीएन – ३०१७ / प्र . क्र . ५३३ / नवि २२ , दिनांक ०६ . ०९ . २०१८ अन्वये शासनाने सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सदाशिव दादासाहेब खाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, आणि ज्याअर्थी, सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सदाशिव दादासाहेब खाडे यांच्या ऐवजी विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची नियुक्ती शासनास इष्ट वाटते, त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ११३ च्या पोट कलम ( २ ) व ( ६ ) तसेच कलम ७ व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबत त्यास समर्थ करणाऱ्या अन्य सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी ( टर्म्स ऑफ ऑफिस अॅन्ड कन्डीशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ मेंबर्स) रूल्स, १९७६ मधील नियम ३ नुसार महाराष्ट्र शासन, याव्दारे विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी शासन अधिसूचना क्रमांक – पीसीएन ३०१७ / प्र . क्र . ५३३ / नवि – २२ , दिनांक ०६ . ०९ . २०१८ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करत आहेत. सदर अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या ( १ ) सदाशिव दादासाहेब खाडे, अध्यक्ष याऐवजी विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे, अध्यक्ष असे वाचावे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उप सचिव अनिष परशुरामे यांच्या सहीने हे परिपत्रक जरी केले, असे या परिपत्रकात म्हटले आहे.