- विभागीय आयुक्तांकडे शिफारस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. पक्षनेते पवार यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. तसेच पक्षानेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या भाजपच्या गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची आज निवड निश्चित करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांनी आज (बुधवारी) दिली. या फेरबदलाला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळताच महापौर उषा ढोरे या ढाके यांना निवडीचे पत्र देतील. त्यानंतर अधिकृतपणे ढाके यांची सभागृहनेतेपदी निवड होईल.
दरम्यान नामदेव ढाके यांची शहर भाजपचे निष्ठावंत व कामगार नेते म्हणून ओळख आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येताच प्रथम महापौर म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांना त्यावेळी डावलण्यात आले. त्यानंतर आज पक्षनेतेपदी त्यांच्या नावाची शिफारस पक्षाने केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना नामदेव ढाके यांना पक्षाने पक्षनेतेपदी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.