न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी जत्रा ४ ते ८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या जत्रेसाठी पालिकेने प्रथमच खासगी समन्वयक म्हणून एजन्सीची नियुक्ती करण्याचे नियोजन केले आहे. ही संस्था पालिकेकडून शुल्क न घेता खासगी कंपन्यांच्या ‘ सीएसआर ‘ निधीतून खर्च करणार आहे.
शहरातील महिला बचत गटांनी व निर्माण केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पालिका दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित करते. सलग तिसऱ्या वर्षी ही जत्रा सांगवीत होत आहे. जत्रा आयोजनासाठी पालिका यंदा प्रथमच पॉइंट ऑफ व्ह्यू या एजन्सीची नियुक्ती करणार आहे.
ही एजन्सी मैदानाची पाहणी करून ८०० स्टॉल, जत्रेची थीम व संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा तयार करणार आहे. संपूर्ण ५ दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणार आहे. खासगी कंपन्यांकडून सीएसआर अंतर्गत निधी जमा करणार आहे. त्यातून जत्रेचे प्रवेशद्वार, प्रचार गीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
या संदर्भात एजन्सीकडून विविध खासगी कंपन्या व व्यावसायिकांशी चर्चा केली आहे. ती एजन्सी थेट खर्च अदा करणार आहे. या एजन्सीला पालिका कोणतेही शुल्क अदा करणार नाही. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी (दि. १२) झालेल्या सभेत दाखल करण्यात आला.