न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात काम करीत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून एका मजुरासह पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठेकेदाराला दोषी ठरविले असून, त्याच्याकडून काम काढून घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर, पालिकेच्या अधिकाऱ्यांची या घटनेत काही चूक नसल्याचा निर्वाळा समितीने दिला आहे.
राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान अंतर्गत ( अमृत योजना ) दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजसाठी १ डिसेंबर रोजी खोदकाम सुरू होते. रविवारी सुटीच्या दिवशी काम करीत असताना मजूर नागेश जमादार आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना अग्निशामक दलाचा फायरमन विशाल जाधव यांच्यावर मातीचा ढिगारा पडून त्याचा गुदमरून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले.
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी शहर अभियंता राजन पाटील व सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची द्विसदस्यीय समिती नेमली होती. समितीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यात ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी शिफारस केली आहे. चौकशी अहवालानुसार आयुक्तांनी ठेकेदार पाटील कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरला पूर्णपणे दोषी ठरविले आहे. पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती न देता सुटीच्या दिवशी काम चालू ठेवण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे दोषी ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिकारी दोषी नसल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.
आकुर्डीत खोदकाम केल्याने दुचाकी घसरून एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, कामास विलंब केल्याने ठेकेदारास दररोज १ लाख रुपये दंड आकारणी केली जात आहे.