न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्प, नदी संवर्धन प्रकल्प, पुणे जिल्हा विकासकामे आदि विषयावर जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा घेण्यात आली.
केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो ची मदत होणार असून मेट्रोच्या कामांसाठी केंद्र सरकार आवश्यक निधी पुरवेल, तथापि ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनासंबंधी सविस्तर आराखडा तयार करावा, घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर द्या. मुळा-मुठा नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती, माध्यान्ह भोजन, अंगणवाडी पूरक पोषण आहार, शहर व लगतच्या भागातील कचरा व्यवस्थापन, रेल्वे स्टेशन वरील वाय-फाय सुविधा, आयुष्यमान भारत योजना, समग्र शिक्षा योजना आदी विषयांवर चर्चा झाली.
यावेळी सभेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री वन, पर्यावरण आणि हवामान बदल व माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार गिरीष बापट, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी, पुणे तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, पुणे महानगर पालिका महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते