- राहुल कलाटे यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी काढलेल्या ६४७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविताना घोळ घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, प्रशासन, पदाधिका-यांबाबत चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेला आहे. ही निविदा राबविल्यामुळे महापालिकेचा आर्थिक फायदा होईल असे धादांत खोटे गाजर दाखविले जात आहे. ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेऊन अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. सहा पॅकेजसाठी सहाच ठेकेदार आलटून-पालटून आहेत. त्यामुळे रिंग होण्यास मोठा वाव आहे. यातून ठेकेदारावर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे.
याशिवाय ११०० कामगार बेरोजगार होणार आहेत. यांत्रिकीकरणामुळे आर्थिक नुकसान होणार नसल्याचे सांगत यापूर्वी घरोघरचा कचरा गोळ्या करण्यासाठी शहराचे दोन भाग केले. निविदा राबविली. परंतु, प्रत्यक्षात मनुष्यबळ कपात झाली. शेकडो कामगार बेरोजगार झाले. या निविदेत देखील महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. पुण्यात राबविण्यात आलेली रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईची पद्धत अवघ्या नऊ महिन्यात अयशस्वी ठरल्यामुळे गुंडाळावी लागली.
केवळ सत्ताधारी भाजपच्या हट्टापायी पुणे महापालिकेत अयशस्वी झालेला प्रयोग पिंपरीत राबविला जात आहे. भ्रष्टाचाराच्याच हेतून हा सर्व प्रकार राबविला जात आहे. ही निविदा राबविताना ज्या अधिका-यांनी ठेकेदारांचे हित जपले, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्या अधिका-यांवर कडक कारवाई करावी. ही निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.











