न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०२० रोजी सलग अठरा तास शिवछत्रपती साहित्य वाचन उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातील सर्व वयोगटातील सुमारे ५०० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ' शिवाजी- द मॅनेजमेंट गुरु' हे पुस्तक वाचनासाठी देण्यात येणार असून या ग्रंथाचे वाचन, त्यावरील लिखाण व वक्तृत्व अशा तिन्ही बाबींचा समावेश आहे. या उपक्रमाच्या उद्धाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी आहेत. महापौर श्रीमती उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विशेष उपस्थितांमध्ये खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोलकोल्हे, आमदार संग्राम थोपटे व आण्णा बनसोडे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख व अन्य पदाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक व मान्यवर सदर उपक्रमास भेट देणार आहेत.
या उपक्रमामध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या व प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येईल. हा उपक्रम पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी चार वाजता सुरुवात होऊन बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या उपक्रमाचा समारोप होणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चहा, अल्पोपहार तसेच भोजन दिले जाणार आहे. या
उपक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे सहकार्य असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.











