न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- शहरात दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत असून शहरामध्ये सद्यस्थितीला सहा अग्निशामक केंद्र आहेत. मात्र वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर ताण येतो. त्यासाठी मोशी येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार आहे.
महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे मुख्य कार्यालय संत तुकाराम नगर येथे आहे. याव्यतिरिक्त निगडी प्राधिकरण भोसरी, रहाटणी, चिखली आणि तळवडे येथे उपकार्यालये आहेत. शहराची हद्द मोठी असल्याने अग्निशामक विभागाच्या उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणावर ताण असतो.
या सर्व गोष्टींचा विचार करुन मोशी येथे अग्निशामक विभागाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्थापत्य विभागामार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या. मेसर्स पी. एन. नागणे या ठेकेदारांने निविदा सादर केली. त्यांनी हे काम ३ कोटी ७६ लाख रुपयांमध्ये करण्याचे मान्य केले. मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला आहे.