न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांना भूखंड देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानुसार एकूण १२६ लाभार्थ्यांची सोडत देखील काढण्यात आलेली आहे. महापालिकेकडून या भूखंडासाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचे काम सध्या सुरू आहे.
प्राधिकरण सभेचा ठराव झाल्यानंतर प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा रहिवाशांना दिला जाणार आहे. प्राधिकरणाकडून विकसित स्पाइन रस्त्यामध्ये त्रिवेणीनगर चौकात नागरिकांची घरे बाधित होत असल्याने तेथील रस्त्याचे काम बाकी आहे. त्या बाधित नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असलेली प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ११ मधील १४ हजार ७८४ चौरसमीटर जागा यापूर्वीच प्राधिकरणाने महापालिकेच्या ताब्यात दिलेली आहे. या भूखंडावर महापालिकेने स्पाइन रोड बाधितांचे पुनर्वसन हाती घेतले होते. तथापि, ही जागा पुनर्वसनाठी अपुरी पडत होती. त्यामुळे प्राधिकरणाने ६ हजार २८२. ७४ चौरस मीटर क्षेत्राचा वाढीव भखंड महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे.
त्रिवेणीनगर येथे स्पाइन रस्ता बाधितांसाठी आवश्यक भूखंड प्राधिकरणाकडून महापालिकेला देण्यात आलेले आहे. त्याबाबत लाभार्थ्यांची यादी महापालिकेने तयार केली आहे. त्यानुसार लवकरच रस्ता बाधित नागरिकांना भूखंड दिले जाणार आहे.
– प्रमोद यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.