न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील टिळक चौकात संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा बसविण्याची मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना हिंगे यांनी पत्र दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म दि. ८ डिसेंबर १६२४ रोजी चाकण येथे झाला. संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या टाळकऱ्यांतील प्रमुख टाळकरी होते. त्यांना सन्तु तेली नावानेही ओळखले जात होते. संत तुकाराम महाराजांचे बहुतांशी अभंग हे संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिले होते.
संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून राज्य शासनाने दि. ८ डिसेंबर रोजी त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा टिळक चौकात उभारण्यासाठी आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे हिंगे यांनी पत्रात म्हटले आहे.