- कृती समितीच्या प्रसंगावधानामुळे पुढील अपघात टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- सेक्टर २८ प्राधिकरणमधील भविष्य निर्वाह निधी तसेच न्यायालय कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या ट्रान्सफार्मरच्या केबलला रविवारी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास “कावळा” शॉर्ट सर्किटमुळे मोठा आवाज होऊन आग लागली. तेथे संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात उपस्थित असलेले प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पदाधिकारी विजय मुनोत, संतोष चव्हाण यांच्या ते लक्षात आले.
केबल ची आग ट्रान्सफॉर्मर पर्यंत पोहचण्याअगोदर ती विझवणे आवश्यक होती. ट्रान्सफॉर्मर ऑईल ने पूर्णपणे भरलेला असल्याने आग त्वरित नियंत्रित होणे आवश्यक होते. याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी तातडीने ९९२२५०१४७५ ह्या मोबाईल नंबर वर संपर्क करून पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागास आगीबद्दल कळविले. पालिकेचे अग्निशामक रेस्क्यू टीमचे जवानही काही मिनिटातच तेथे पोहचले व आग तातडीने विझवण्यात आली.
ट्रान्सफॉर्मर पर्यंत आगीच्या ज्वाळा पोहचण्याअगोदरच आग विझवण्यात यश आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिसरातील रहिवाशी व उपस्थित नागरिकांनी समिती कार्यकर्त्यांचे व अग्निशामक जवानांचे कौतुक करून आभारही मानले.












