- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांचा सहाय्यक आयुक्तांना सज्जड इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- सध्या सर्वत्रच विभक्त कुटूंब पद्धती रुढ होत आहे. शहरात महागाई, राहण्यासाठी छोटी जागा या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, शहरातील व परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक एकत्र यावेत. त्या निमित्ताने विचारांची आदान-प्रदान व्हावी. त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था, वाचनालय व इतर सुविधा असाव्यात. या कारणासाठी शहरात जेष्ठ नागरिक संघाची स्थापना केली जाते. मात्र बहुतांशी या बाबींकडे महापालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो. चिखली-कुदळवाडीतील श्री भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाच्या मागणीकडेही प्रशासनाने असेच दुर्लक्ष केले.
या बाबतीत ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्यांची दखल घेत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती व विकास योजना विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली. तसेच, चिखली-कुदळवाडीतील श्री भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ (नोंदणी प्रमाणपत्र क्र. ४८७४९) यांना महानगरपालिकेकडून टेबल व खुर्च्या त्वरित उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असा सज्जड इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.















