न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची माहे फेब्रवारी महिन्याची तहकूब बुधवारी (दि. २६) रोजी पार पडली. या सभेत सभाशास्राचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज करण्यात आले आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या सभेमध्ये केवळ चार मिनिटांत अठरा विषय व पाच उपसुचना विषयांचे वाचन न करताच मंजुर करण्यात आल्या. तसेच या उपसुचना न मांडता त्या उपसुचनांना सुचक व अनुमोदनही कोणत्याही नगरसदस्यांने दिले नाही. तरी, त्या उपसूचना मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटींच्या उपसुचनांच्या वैधतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्या तांत्रिकदृष्टया बेकायदेशीरही ठरतात. कोट्यावधी रुपयांच्या उपसुचना घुसडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सभागृहामध्ये सुनियोजित गोंधळ घालून उपसुचना न वाचताच मंजूर केल्या आहेत.
याबाबत आम्ही त्याच दिवशी पत्राव्दारे दिलेल्या उपसुचनांच्या प्रतींची मागणी केली आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडेही या उपसुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये नक्कीच गोलमोल आहे. या उपसुचना रद्द करण्यात याव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी असल्याचेही नाना काटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.


















